डीजेमुक्त संकल्पनेतून पारंपरिक संस्कृतीला मिळाला उजाळा – माणिक बोंदर
कळंब (धनाजी भालेराव)- गेल्या 7-8 वर्षांपासून गणेश विसर्जन असो वा कुठल्याही महापुरुषांचा जयंती उत्सव कळंबमध्ये मोठ्या प्रमाणात डीजे वाजायचे. याचा त्रास मोठ्या प्रमाणावर वृद्धांना व लहान मुलांना व्हायचा.
मात्र यावर्षी कळंब शहराने सर्वांसमोर एक नवीन आदर्श निर्माण झाला. कळंबमधून नवीन सुरूवात होऊन गणपती बाप्पाचे विसर्जन अगदी पारंपारिक पद्धतीने डीजेमुक्त झाले. निश्चितच याच्यामुळे येणाऱ्या पिढीला शिकवण मिळून संस्कृतीदेखील जपली जाईल.
डीजे मुक्तीची संकल्पना मांडणाऱ्या ज्येष्ठ नागरिक संघाचे खरंच आभार व्यक्त करत भाजपा तालुका सरचिटणीस माणिक बोंदर म्हणाले की नाविण्यासाठी तरुणाची गरज असते; मात्र या जेष्ठांनीच तरुणांसोबत नाविन्यपूर्ण आदर्श समोर ठेवला. हा प्रसंग म्हणजे चक्क गणपती बाप्पानेच ज्येष्ठ नागरिक संघ जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसूळ व पोलीस निरीक्षक सानप साहेबांच्या स्वप्नात येऊन डीजे मुक्तीची संकल्पना मांडली असावी. आजच्या गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीचा लहान मुले, महिला व वृद्धांनी देखील बाप्पांचे दर्शन घेत उत्साही वातावरणात बाप्पांना निरोप दिला. गणेश भक्तिपर गिते, विविध भावगीते गाऊन शांतपणे मिरवणूक काढली. यामुळे संस्कृतीचं दर्शनदेखील घडून आले. अतिशय पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणाऱ्या गणेश मंडळांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो.
यासाठी ऊर्जा देणाऱ्या ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसूळ व पोलीस निरीक्षक सानप साहेब यांचा सन्मान करणार असल्याचे मत कळंब भाजपा तालुका सरचिटणीस माणिक बोंदर यांनी सांगितले.