‘आपलं कळंब डीजेमुक्त कळंब’ ही मोहीम राबवावी- ज्येष्ठ नागरिक महासंघाची मागणी


कळंब(धनाजी भालेराव)- शहरांमध्ये महापुरुषांची जयंती व इतर सण- उत्सव निमित्त, मिरवणुकीसाठी डीजे डॉल्बीचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असून डीजे डॉल्बीच्या कर्ण कर्कश आवाज यामुळे ज्येष्ठ, लहान मुले, महिला व आजारी व्यक्तींना त्रास होतो. ध्वनी प्रदूषण, हृदयरोग कानाचे पडदे फाटणे, चक्कर येणे, लेझर किरणापासून डोळ्यांना आपाय आदी समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण होत असून याला प्रतिबंध घालण्यात यावा अशी मागणी ज्येष्ठ नागरिक महासंघाच्यावतीने कळंब पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवी सानप यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली असून डीजेमुळे झालेल्या परिणामाची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी जनजागृती करण्यात येत असून याविषयीचे मोठे बॅनर छत्रपती शिवाजी महाराज चौक कळंब येथे लावण्यात आले आहे. आपलं कळंब डीजेमुक्त कळंब या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन याद्वारे करण्यात आले आहे. कळंब शहर हे सुसंस्कृत शहर असून मागील चार-पाच वर्षापासून कळंब शहरांमध्ये सर्व धर्मीयांच्या सण उत्सवामध्ये व महापुरुषांच्या जयंतीमध्ये सर्रास डीजे डॉल्बीचा वापर वाढला आहे. तो बंद कसा होईल याचा विचार होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले असून शहरातील नागरिकांनी या जनजागृती कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसूळ, प्रकाश भडंगे, प्रा.डॉ. संजय कांबळे, बजरंग ताटे, माधवसिंग राजपूत, बंडू ताटे, सचिन क्षिरसागर, अमन इसाक शेख, सादिक हुसेन शेख यांनी सहभाग घेतला. पोलीस निरीक्षक रवी सानप स्थानिक गुन्हा शाखेचे श्रीराम मायंदे यांनी बॅनर विषयीची माहिती घेतली व उपक्रमाचे स्वागत केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!