सरसंघचालक मोहन भागवत यांची संघ पदाधिकारी प्रशांत वाघमारे यांच्या घरी कौटुंबिक भेट
केज- लातूर येथील एका नियोजित कार्यक्रमासाठी जात असताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी केज येथे संघाचे पदाधिकारी प्रशांत वाघमारे यांच्या घरी भेट देत भोजन करत कौटुंबिक संवाद साधला. दरम्यान, त्यांनी जयंतीनिमित्त शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.
१९ फेब्रुवारी सकाळपासूनच शहरातील बीड रोडवरील लक्ष्मीनगरजवळील भागात पोलिसांचा मोठा ताफा दिसू लागल्याने कोण येत आहे? याची लोकांना उत्सुकता लागली होती. दुपारी १२ वाजेच्या सुमारास सरसंघचालक मोहन भागवत यांचे केजमध्ये आगमन झाले अन् ते संघाचे पदाधिकारी असलेले प्रशांत वाघमारे यांच्या घरी पोहचले. 4 वाजेपर्यंत थांबलेल्या भागवत यांनी या ठिकाणी भोजन केले.संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांबरोबरच वाघमारे यांच्या कुटुंबाशी संवाद साधला. दुपारी चार वाजता पुढे मार्गस्थ होताना भागवत यांनी बाहेर उभ्या असलेल्या संघ कार्यकत्यांना शाखा कशा चालू आहेत? असा प्रश्न केला व आता वेळेअभावी जास्त बोलता येणार नाही, असे सांगत लातूर येथील नियोजित कार्यक्रमासाठी निघून गेले. *कोण आहेत प्रशांत वाघमारे ?*
केज शहरातील प्रशांत वाघमारे हे व्यवसायाने शिक्षक आहेत ते मागील पंचेवीस वर्षांपासून संघाशी जोडले गेलेले आहेत. ते आज संघाच्या पदावरही कार्यरत आहेत. त्यांच्यासाठी हा मोठा आनंदाचा क्षण होता. कोणत्याही सरसंघचालकाने केजला भेट देण्याची ही पहिलीच वेळ असल्याने केजवासीयांसाठी हा ऐतिहासिक क्षण होता याची नोंद इतिहासात राहील.
*रमेश आडसकरांनी दिली ज्ञानेश्वरी*
मोहन भागवत केजमध्ये आल्याची माहिती मिळताच भाजप नेते रमेश आडसकर यांनी भागवत यांची भेट घेत त्यांना ज्ञानेश्वरी भेट देत आपला परिचय देखील करून दिला.